पाचवी, आठवीच्या शंभर टक्के मुलांना द्यावी लागणार शिष्यवृत्ती परीक्षा

अध्यक्ष रोहन बने;  जि. प. च्या बैठकीत निर्णय

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दिला जाणारा गुणवंत आदर्श पुरस्कार निवड करताना शिष्यवृत्ती, नवोदय आणि स्पर्धा परिक्षांमधील विद्यार्थ्यांचे यशाचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी पाचवी, आठवीची शंभर टक्के मुले शिष्यवृत्ती परिक्षेत बसवण्याचा निर्णय गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष रोहन बने यांनी दिली.

शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवत्ता वाढीसाठी अध्यक्ष बने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, परशुराम कदम, दिपक नागले, शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर, उपाशक्षणाधिकारी श्री. मुरकुटे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. कोकण बोर्ड राज्यात सर्वप्रथम आहे. जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. कमी असलेला वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. एकच लक्ष्य ठेवून उपक्रम न राबविल्यामुळे त्याचा परिणाम होत नाही. शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि शिष्यवृत्ती सह सर्व स्पर्धा परिक्षातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वतंत्र कक्ष जिल्हास्तरावर स्थापन केला आहे. त्याला गुणवत्ता कक्ष नाव दिले आहे. स्पर्धा परिक्षेत विद्यार्थी व शिक्षक पारंगत होणे आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक उपक्रम न राबवता स्पर्धा परिक्षा हेच लक्ष्य ठेवले तर यश संपादन होईल. शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा हे गुणवत्ता दाखविण्याचे साधन आहे. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग सुकर होईल. यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी उपाय योजनांवर चर्चा झाली. यामध्ये पाचवी, आठवीमधील 100 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवण्यात येणार आहे. तसेच नवोदय परीक्षेलाही 100 टक्के विद्यार्थी बसतील. सात दिवसांत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा दर शनिवारी घेतली जाईल. त्यात घटकनिहाय मूल्यमापन केले जाईल. या गुणवत्तेवरच शिक्षकांचे मुल्यमापन होईल. आदर्श शिक्षक पुरस्कार देताना 90 गुण हे शिष्यवृत्तीमधील यशावर अवलंबून असतील. पालक, विद्यार्थी यांच्या बैठका घेऊन स्पर्धा परिक्षांचे महत्त्व पटवून दिले जाईल. जास्तीत जास्त शाळा सेमी इंग्लिश करण्यात येणार आहेत. गुणवत्ता कक्षाची बैठक दर तीन महिन्यांनी घेऊन आढावा घेतला जाईल.