पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पाण्याची स्थिती गंभीर; ११० गावात भीषण पाणी टंचाई

रत्नागिरी:- जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. जिल्ह्यातील ११० गावांतील २१३ वाड्यांतील लोक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. २१३ वाड्यांना पाणीपुरवठ्याची भिस्त केवळ २० टँकरवर आहे.

जिल्ह्यात पाऊस लांबल्याने धरणे, नदी, नाले, विहिरी, विंधन विहिरी आटल्या आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. तर प्राणी, पक्षी तहानेने व्याकूळ झालेले चित्र पाहायला मिळत आहे. पाणीटंचाईमुळे पाणी विक्रेते व टँकर मालक मात्र मालामाल होत आहेत. दिवसांतून हजारो लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यातून बक्कळ कमाई होत आहे.

जिल्ह्यातील राजापूर तालुका वगळता आठही तालुक्यांतील ४०,४६५ लोकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना ४ शासकीय आणि १६ खासगी टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इतक्या लोकांना कसा आणि किती प्रमाणात पाणीपुरवठा केला जाताे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्यात आणखी पाऊस लांबल्यास पाण्यासाठी लोकांचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.