पाऊस रिटर्न; कोकणातील जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

रत्नागिरी:- ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीच विश्रांती घेतलेल्या पावसाने दुसर्‍या पंधरवड्यातही पाठ फिरवली. दोन दिवसांपासून ऊन – पावसाचा खेळ सुरू असला तरी मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस बरसला. त्यानंतर मात्र पुढील तीन दिवस जिल्ह्यात पावसाने दडी मारली. आठवडा भर पावसाचा खंड सुरू आहे. मागील दोन दिवस ऊन आणि पाऊस यांचा खेळ सुरू आहे. मात्र, येत्या २४ तासांत कोकण किनारपट्टी भागातील रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा; तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

यंदा पाऊस लवकर सुरू होण्याबरोबरच वार्षिक सरासरीपेक्षाही पाऊस अधिक पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. .जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत २८१३ मि.मी. सरासरी वाटचाल पूर्ण केली असून, ८३ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी या कालावधीत २३८२ मि.मी.च्या सरासरीने ७० टक्के पाऊस झाला. गतवर्षाच्या तुलनेत पाऊस १० टक्क्याने जास्त आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मि.मी. सरासरी पाऊस होतो. या तुलनेत ६०० मि.मी. पाऊस अद्याप होणे अपेक्षित आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यातील पावसाने पुरती दडी मारल्याने पावसाची सरासरी वाटचाल अडचणीची झाली आहे.