रत्नागिरी:- गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून म्हणजेच 25 जुलैपासून सक्रीय होणार असून कोकण किनापट्टी भागासह मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5 दिवस कोकणातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या 5 दिवसांत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात मान्सून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जून महिन्यात पहिल्या टप्प्यात विश्रांती घेतलेल्या पाऊसे जुलै महिन्यात जोरदार सक्रीय झाला. मात्र, गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे अनेक भागात पावसाचा जोरही ओसरला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाचा सरासरी टप्पा पिछाडी पडला आहे. गतवर्षी याच कालावधीत पावसाने पावणे तीन हजार मि.मीची सरासरी पुणर्र् केली होती. मात्र यंदा पाऊस गतवर्षाच्या तुलनेत हजार मि.मी.ने पिछाडीवर पडला आहे.
जिल्ह्यात आता पर्यंत 1819 मि.मी. च्या सरासरीने साडे सोळा हजार मि.मी.ची मजल गाठली आहे. गतवर्षी याचा कालावधीत पावसाने 24,709 मि.मी. ची एकूण मजल गाठली होती. मात्र उद्यापासून पाच दिवस पाऊस पुन्हा जोरदार सक्रीय होण्याची शक्यता आयएमडीच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. या कालावधीत कोकण किनारपट्टीतील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्यास कळवण्यात आले आहे.
रविवारपासून सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात काही ठिकाणी जोरदार गडगडाटासह पाऊस पडणे अपेक्षित आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांसह धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांसाठी मान्सून अलर्ट जारी करण्यात आला आहे.