रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या नविन नळपाणी योजनेतील अंतर्गत वितरण जलवाहिनी पाण्याच्या आणि हवेच्या दाबामुळे फुटू नये यासाठी 50 एअर वॉल्व बसवण्याचे काम केले जात आहे. नुकतेच हे काम सुरु झाले असून आत्तापर्यंत 4 ठिकाणी वॉल्व बसवण्यात आले आहेत. सर्व वॉल्व बसवण्याचे काम महिनाभरात पूर्ण होईल, असे रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी सांगितले.
रत्नागिरी शहराच्या नविन नळपाणी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरु झाला आहे. रत्नागिरी शहराची भौगोलिक रचना चढ-उताराची असल्याने पाणी सोडल्यानंतर हवेचा दाब आणि पाण्याचा दाब कमी-जास्त होवून जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत होते. नविन योजनेतून पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर वरचेवर जलवाहिनी फुटत होती. या दुरुस्तीसाठी रस्ता खोदाई करावी लागत होती. त्यामुळे चांगल्या रस्त्यांची दुरवस्था होत होती. त्यामुळे मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी एअर वॉल्व बसवून जलवाहिनी फुटण्यावर नियंत्रण आणण्याचे नियोजन केले.
मुख्याधिकारी बाबर आणि अभियंता भोईर यांच्या नियोजनानुसार अंतर्गत जलवाहिन्यांना एअर वॉल्व बसवण्याचे काम सुरु झाले आहे. सुमारे 50 ठिकाणी हे वॉल्व बसवले जाणार आहेत. या वॉल्वमुळे जलवाहिनीला आवश्यक तेवढाच दाब मिळणार असल्याने ते फुटण्यावर नियंत्रण येणार आहे. पावसाळ्यात धरणातील पाणी साठा वाढल्यानंतर पाण्याचा दाबही वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर त्यावेळी जलवाहिनी फुटू नये यासाठी मुख्याधिकारी यांनी अभियंत्यांनी हे नियोजन केले आहे. महिनाभरात सर्व 50 वॉल्व बसवण्याचे काम पूर्ण होणार आहे.