पश्चिम किनारपट्टीवर चिनी ट्रॉलर्सची घुसखोरी

एक हजाराहून अधिक ट्रॉलर्स, चिंताजनक बाब 

रत्नागिरी:- पश्चिम किनारपट्टीवर १ हजाराहून अधिक चिनी ट्रॉलर्स मासळीच्या शोधात फिरत आहेत. चिनची घुसखोरी केवळ जमिनीवरच थांबलेली नसून समुद्रामध्येही सुरु असल्याचे उघड होऊ लागले आहे. चिनसह अन्य देशातील मच्छीमारही मोठ्या प्रमाणावर भारताच्या हद्दीमध्ये मासेमारीसाठी येत असून ही बाब चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
 

अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्या चिनी ट्रॉलर्सच्या वाढत्या संख्येबाबत भारतीय मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली आहे. परदेशातील १००० पेक्षा जास्त ट्रॉलर्स पश्चिम किनारपट्टीवरील मासळीच्या स्त्रोतांसह अन्य नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर करत असल्याचे निरिक्षण भारतीय मच्छिमारांनी नोंदवले असून, यातून भारताला पोच असलेल्या हानीबद्दल सावध राहण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. मासेमारीच्या उद्देश्याने तेल साठांचा शोध? ऑल केरळ फिशिंग बोट ऑपरेटर असोसिएशनचे सरचिटणीस जोसेफ झेवियर म्हणाले की, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने परदेशी ट्रॉलर्स व जहाजांमार्फत खोल समुद्रामधील मासळीचा शोध घेतला जात आहे. भारतीय मच्छीमार हवामान व तांत्रिक कारणांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात पोचू शकत नाही. जोसेफ झेवियर यांनी चिनी ट्रॉलर्स व जहाजे समुद्र तळाशी असलेल्या व भारतीयांना दीर्घकाळ पुरणाऱ्या पेट्रोलियम साठ्यांचा शोध घेत असल्याची शंकाही बोलून दाखवली आहे.