पर्ससीन व्यावसायिकांना खलाशांची वानवा 

1 सप्टेंबर पासून पर्ससीन मासेमारीला सुरुवात

रत्नागिरी:- ट्रॉलिंग, गिलनेटपाठोपाठ 1 सप्टेंबरपासून पर्ससिननेटद्वारे मासेमारीला सुरवात होणार आहे. कोविडमुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम खलाशांच्या आगमनावर होणार आहे. काही मच्छीमारांना खलाशांअभावी बंदरात उभ्या ठेवण्याची वेळ येणार आहे.

डॉ. सोमवंशी समितीच्या शिफासशीनुसार 5 फेब्रुवारी 2016 ला पर्ससीन, रिंगसीन (मीनी पर्ससीन) मासेमारीवर प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्ससीन परवानेधारक नौकांवर निर्बंध घालण्यात आले होते. 500 मीटर लांब, 40 मीटर उंची, 25 मिमीपेक्षा कमी नसलेल्या आसाच्या पर्ससीन जाळ्याने मासेमारी करण्यासाठी 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा कालावधी निश्‍चित करुन दिला आहे. शासनाच्या आदेशानुसार 1 सप्टेंबरपासून पर्ससिननेट मच्छीमारीला सुरवात होणार आहे. मागील हंगामात अखेरच्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे गणित कोलमडले होते. काही काळ मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्याचा आर्थिक भुर्दंड मच्छीमारांना बसला होता. यंदा सुरवातीलाच खलाशांना आणण्यासाठी ईपास काढण्यापासून त्यांना क्वारंटाईन करुन ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागत आहेत. काही नौकांनी ठाणे, पालघर येथून खलाशी आणून ठेवले आहेत. कर्नाटक, ओरीसा, बीहार या राज्यातून येणार्‍यांसाठी खटपट सुरु आहे. या गडबडीत 25 ते 30 टक्केच पर्ससिननेट नौका समुद्रावर स्वार होतील अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात परवानाधारक पर्ससिननेट नौकांची संख्या सुमारे पावणेतीनशे इतकी आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्यातच या नौका आहेत. कोरोनाच्या सावटाखाली ही मासेमारी सुरु होणार आहे. कर्नाटक बरोबरच नेपाळमधील अनेकजण बोटींवर काम करण्यासाठी गेल्या काही वर्षात कोकणात येत आहेत. कोरोनामुळे नेपाळमधून भारतात येण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अनेक नेपाळी येऊ शकलेले नसल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी अन्य राज्यातील किंवा ठाणे, पालघर येथील लोकांचा पर्याय मच्छीमारांना अवलंबावा लागणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होईल असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. एका बोटीवर 25 ते 30 खलाशी काम करतात. जिल्ह्यात खलाशी म्हणून काम करण्यासाठी सुमारे 8 ते 9 हजार जणं मासेमारी हंगामात येतात. महिन्याचा एका खलाशाचा खर्च किमान दहा हजार रुपये इतका आहे.