पर्ससीन नौकांना पन्नास हजार ते एक लाखाची उष्टी बांगडी

रत्नागिरी:- पर्ससीन नेटद्वारे मासेमारीला गुरुवारीपासून (ता. १) सुरूवात झाली. मच्छीमारांना गणराय पावला असून वातावरण निवळलेले असल्याने समुद्रात जाण्याचा मार्ग सुरळीत होता. मच्छीमारांना सुरवातीलाच १०० ते २०० डिश (एक डिश ३२ किलोची) उष्टी बांगडी सापडली आहे. एका डिशला पाचशे रुपये प्रमाणे मच्छीमारांना पन्नास हजार ते एक लाख रुपयेपर्यंतची मासळी मिळाली आहे.

शासनाच्या नियमानुसार १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारीला सुरवात होते. जिल्ह्यात पावणेतीनशेहून अधिक पर्ससिननेटने मासेमारी करणार्‍या नौका आहेत. त्यात राजापूर, रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक नौका आहेत. ऑगस्ट महिन्यात ट्रॉलिंग, गिलनेटने मासेमारी सुरु झाली होती. पावसाळी वातावरणामुळे अनेकवेळा ब्रेक घ्यावा लागला. गेल्या काही दिवसात वारेही थांबले होते. समुद्र शांत असल्यामुळे मच्छीमारी व्यावसाय सुसाट होता. हंगामाच्या आरंभीलाच पर्ससिननेटने मासेमारी करणार्‍यांना चांगले वातावरण मिळाले आहे. गुरुवारी पहाटेला अनेक नौकांनी बारा वावाच्या पुढे जाऊन मासे पकडण्यासाठी जाळी मारली. पहिल्या फटक्या उष्टी बांगडी हा मासा बर्‍यापैकी जाळ्यात सापडला आहे. त्यातील काहींना शंभर डिश तर काहींना दोनशे डिश मासा मिळाला आहे. या व्यतिरिक्त जाळ्यात अन्य प्रकारचेही मासे मिळाले आहेत. पण त्याचे प्रमाण अत्यल्पच आहे. उष्टी बांगडी फिशमिलला पाठवण्यात येते. सध्याचा दर एका डिशला ५०० रुपये मिळत आहे.
जिल्ह्यातील एकुण पर्ससिननेट नौकांपैकी पन्नासहून अधिक नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. नौकेवर खलाशी म्हणून काम करण्यासाठी नेपाळ, ओडीसा, कर्नाटक यासह रायगडमधून लोकं आणली जातात. अजुनही खलाशी दाखल झालेले नाहीत. त्यामुळे उर्वरित नौका गणेशोत्सवानंतरच समुद्रात जातील असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.