पर्यटन स्थळाची ऐतिहासिक माहिती गोळा करून त्या पर्यटन स्थळाला बोलके करावे: रमेश कीर

रत्नागिरीत पर्यटन गाईड प्रशिक्षणाला सुरवात

रत्नागिरी:- रत्नागिरीची संस्कृती, इतिहास, लोकजीवन आणि निसर्गसंपदेची ओळख करून घ्यावी. ईश्वराने आपल्या कोकणावर निसर्ग, प्राणी, पक्षी यांची विपुल प्रमाणात उधळण केली आहे. या संधीचा सुयोग्य वापर करून प्रशिक्षणार्थ्यांनी तिचे सोने करावे. त्याचप्रमाणे गाईड आणि हॉटेल यांनी एकमेकांशी समन्वय साधून या परिसरात असलेल्या हॉटेल यांना व्हिजिटिंग कार्ड पाठवून संपर्क ठेवून गाईडची मागणी पूर्ण करावी. पर्यटन स्थळाची ऐतिहासिक माहिती गोळा करून त्या पर्यटनस्थळाला बोलके करावे, असे प्रतिपादन रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी केले.

पर्यटन संचालनालयाच्या वतीने आजपासून मांडवी येथील हॉटेल सी फॅन्स येथे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनच्या पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या (कोकण विभाग नवी मुंबई) वतीने आजपासून १८ मार्चपर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्घाटनाला रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, आय आयटीटीएम ग्वाल्हेरचे डॉ. चंद्रशेखर बरुवा, हॉटेल सी फॅनचे संचालक सुहास ठाकूरदेसाई आणि कातळ शिल्प अभ्यासक सुधीर रिसबूड उपस्थित होते.

याप्रसंगी उपसंचालक हनुमंत हेडे म्हणाले की, स्थानिक युवकांना पर्यटक गाईड प्रशिक्षण देऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. गाईड पर्यटनस्थळ परिसरातील अत्यंत अचूक आणि महत्त्वाची माहिती देत असतो. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मन लावून हे प्रशिक्षण घ्यावे. या प्रशिक्षण कालावधीत पर्यटन संचालनालयामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्रही देण्यात येणार आहे, असे हेडे यांनी सांगितले.