पर्यटन संस्थांची मागणी; बिच शॅक्स स्थानिकांना द्या
रत्नागिरी:- कोरोनामुळे बंद असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणातील गणपतीपुळे, पावस यासारखी मंदिरे लवकरात लवकर सुरु करावीत. कोकणातील किनार्यांवर सुरु केली जाणारी बिच शॅक्स स्थानिक पर्यटन संस्थांना द्यावीत आणि क्रुजसाठी मांडवी कुरणवाडा येथे टर्मिनल उभारावे, अशा मागण्या पर्यटन संस्थांतर्फे शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
पर्यटन दिनानिमित्त टुरीझम अॅडवायझरीचे सादरीकरणप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत मांडवी पर्यटन संस्थेच्या पदाधिकार्यांनी माहिती दिली. यावेळी रत्नागिरी पर्यटन संस्थेचे राजू कीर, राजू भाटलेकर, बिपीन शिवलकर, प्रवीण रुमडे, ज्योती पाटील, विवेक सावंत, नितीन तळेकर उपस्थित होते.
जगभरातील सर्व पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनारा आवडतो. मुंबईकडून गोव्याला जाणार्या अँग्रिया क्रुझला कोकणात कुठे थांबा नाही, ही दुर्देवाची बाब आहे. त्यासाठी मांडवी, कुरणवाडा, दीपस्तंभाच्या जवळ जेटी किंवा क्रुझ टर्मिनल झाले पाहिजे. मांडवी पर्यटन संस्थेने, पुण्याच्या सेंट्रल वॉटर अड पॉवर रीसर्च स्टेशन या संस्थेला सर्वे करण्यासाठी पत्र दिले आहे. मेरिटाइम बोर्ड आणि टुरिझम मंत्रालयाशीही पत्रव्यवहार केला आहे. त्या ठिकाणी क्रॉस टर्मिनल झाल्यास, स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच कोल्हापूर, सांगली, मिरजचे पर्यटक समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरीत येतात. मांडवी जेटी ते दर्गा असा 90 फुटी रस्ता प्रस्तावित झाल्यास मांडवी किनार्याला शोभा येईल. योग्य फूटपाथ, गटारे, इलेक्ट्रिफिकेशन आणि पथदीप, पर्यटकांना बसण्यासाठी चांगल्या जागा या सुविधा दिल्यामुळे या परिसराचा संपूर्ण कायापालट होईल.
रत्नागिरीत सरकारने, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट शिक्षण संस्था सुरू करावी जेणेकरून कोकणात पर्यटनासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी कुशल कामगार आणि नवोदित उद्योजक तयार होतील, त्याचा कोकणच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात चांगला फायदा होईल. जागतिक पर्यटन दिन साजरा करताना कोकणात रत्नागिरीत पर्यटन वाढावे, रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी वरील पायाभूत गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे असे स्थानिक पर्यटन संस्थेला वाटते. रत्नागिरीतील नवोदित कलाकारांना थिबापॉईट येथे आपली कला सादर करण्यास वाव मिळावा यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.
मंदिरे खुली करा लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील मंदिरे बंद ठेवण्यात आली. ती अजुनही सुरु झालेली नाहीत. गणपतीपुळे, पावस, गणेशगुळे येथील मंदिरे, समुद्रकिनारे तात्काळ सुरु करण्यात यावेत अशी मागणी मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेने केली आहे.









