मंत्री उदय सामंत; जि. प. अध्यक्ष विक्रांत यांच्यावर स्तुतिस्मुमने
रत्नागिरी:-देशातील पहिली जेटबोट गणपतीपुळेत येणार आहे. यामुळे पर्यटक एक-दोन दिवस मुक्काम करतील. पर्यटनाचा विकास झाला तरच जिल्ह्याचा सर्वागिण विकास होऊ शकतो आणि रोजगार मिळू शकतो; मात्र यासाठी प्रशासनाचीही तेवढीच साथ मिळाली पाहीजे, असे प्रतिपादन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या वर्षभरातील कामाचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गौरव केला.
जिल्हा परिषद इमारत भुमिपूजनप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री सामंत म्हणाले, अध्यक्षपद स्विकारल्यानंतर विक्रांत यांनी कामाची चांगली सुरवात केली. मतभेद, मनभेद असू शकतात पण चांगले काम करणार्याच्या मागे आपण सर्वांनी मागे राहील पाहीजे. याच उद्देशाने विक्रांत यांच्या कामामुळे त्याच्याशी आपसूकच जुळवून घ्यावे लागले. एकीकडे वडील आमदार भास्कर जाधव आक्रमक असताना त्यांचे सुपूत्र विक्रांत हे तेवढेच नम्र आहेत. त्यांनी विकासाचा दृष्टीकोन डोळयासमोर ठेवून काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली जिल्हा परिषदेची इमारत आदर्शवत बनविण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
ते पुढे म्हणाले, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, प्रशासकीय इमारत यासाठी निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या इमारती रत्नागिरीच्या सौदर्यांत भर पाडतील अशा उभारल्या जाव्यात यासाठी प्रयत्न केले पाहीजे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी सांघिक पध्दतीने काम केले पाहीजे. विकास कामे करताना प्रशासनाची जाबाबदारी महत्त्वाची असते.
जि. प. इमारत हे माईलस्टोन काम: शेखर निकम
रत्नागिरी जिल्हा परिषदेची इमारीसाठी सहा महिन्यात निधी मंजूर करुन आणणे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव काम आहे. हे चित्र मोजक्याच जिल्ह्यांमध्ये दिसले आहे. अनेक कामांचे आराखडे बनवणे, मान्यता घेणे यासाठी एक-दोन वर्ष लागतात. पण उराशी स्वप्न बाळगून काम करत विक्रांत जाधव यांनी अध्यक्षपदावर बसल्यानंतर इमारतीच्या कामाला मुहूर्तरुप दिले. अकरा महिन्याच्या कारकिर्दीत ध्येय निश्चित करुन माईलस्टोन काम करणे कठीण असते, मात्र विक्रांत यांनी पूर्ण केले, असे गौरवोद्गार काढत आमदार शेखर निकम यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षाने केल्याचा चिमटाही काढला.