पर्यटनस्थळे अद्यापही सुनीसुनी; पर्यटकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही

रत्नागिरी:- मंदिरे सुरु झाल्यानंतर पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी अपेक्षित होती; मात्र अजुनही पर्यटकांचा प्रतिसाद म्हणावा तसा मिळालेला नाही. प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटनस्थळी दिवसभरात सुमारे दोन हजार पर्यटकांनी दर्शनाला हजेरी लावली. परंतु हीच गर्दी राजापूरातील आडीवरे, रत्नागिरीतील भगवतीमंदिर, चिपळूणातील रामवरदायीनी, दापोलीतील चंडिका मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. पर्यटनाला दिवाळीत वेग येईल अशी आशा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनामुळे घरीच राहून कंटाळलेले नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडतील अशी आशा होती. परंतु शाळा सुरु असल्याने पर्यटकांचा राबता म्हणावा तसा नाही. किमान विकेंडला तरी गर्दी वाढण्याची शक्यता होती. श्री क्षेत्र गणपतीपुळेमध्ये शनिवार, रविवारी पर्यटकांचा ओघ कमीच होता. शनिवारी मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी बुकिंगला 30 ते 40 टक्केच प्रतिसाद मिळाला. रविवारी पश्‍चिम महाराष्ट्रातून आलेल्यांचा भरणा अधिक होता. गणपतीपुळे मंदिरामध्ये सायंकाळपर्यंत दोन हजार पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद झाली आहे. यामध्ये स्थानिकाचाही भरणा आहे. किनार्‍यावरही तुरळक गर्दी होती. त्याचा फायदा किनार्‍यावरील स्टॉलधारकांना झाला. नेहमीच्या तुलनेत आजचा दिवस बरा गेला अशा प्रतिक्रिया या व्यावसायिकांच्या होत्या. पर्यटनाला अजुनही वेग आलेला नसून दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतील असा अंदाज बांधला जात आहे. 15 ऑक्टोबरपासून गणपतीपुळे बुकींग सुरु झाले आहे. गणपतीपुळेबरोबरच गुहागर, दापोलीमध्येही पर्यटकांची अशीच स्थिती होती.