परिवहन मंत्री बदल्यांमध्ये व्यस्त त्यामुळेच एसटी कर्मचारी वाऱ्यावर: आ. प्रसाद लाड

रत्नागिरी:- परिवहन मंत्र्यांना एसटी कामगारांचे प्रश्‍न ऐकायला वेळच नाहीये, ते बदल्यांमध्ये बिझी आहेत. त्यांना एसटी कामगारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्यात स्वारस्य नाही पण भाजप नेहमीच एसटी कामगारांसोबत राहील त्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी, असे प्रतिपादन भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केले.

रत्नागिरीतील विभागिय कार्यालयापुढे आंदोलनाला बसलेल्या एसटी कामगारांना भेट दिल्यानंतर श्री. लाड बोलत होते. यावेळी भाजप त्यांच्या मागे उभे आहे, असा विश्‍वासही दिला. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, एसटी कामगारांचा हा लढा कुठल्या पक्षाचा नाही तर विचारांचा आहे. हा लढा सर्वसामान्य कामगारांच्या न्याय हक्कासाठीचा आहे. पोस्टानंतर कुणाला महत्व असले तर ते एसटीला आहे. गावागावातील सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या गरीब जनतेच्या अडीअडचणीच्या वेळेला एसटीचा चालक, वाहक उपयोगी ठरतो. त्यामुळे लालपरीच्या हक्कासाठी रत्नागिरीतील आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. मुंबईत आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत व विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात प्रचंड हजारोच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे काम एसटी कामगार संघटना करत आहे. ही आंदोलनं अशीच जिल्हावार सुरु राहिली पाहीजेत. या आंदोलनाचा आवाज परिवहन मंत्र्यांच्या कानावर गेला पाहिजे. ते रत्नागिरीचे पालकमंत्री आहे, मात्र जिल्ह्यात येतच नाहीत.

साडेतीन हजार पेक्षा जास्त लोकांना कोर्टामध्ये जाऊन निलंबन करण्याचे काम सरकार करत आहे. सध्या वाटतं की महाराष्ट्रात तालिबानी राज्य अवतरलय. लालपरीला जीवंत ठेवण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता कामगारांच्या मागे उभे आहे. मेस्मा लावल्यानंतर घाबरून जाऊ नका. आतापर्यंत आझाद मैदानापर्यंत कुच केली आहे. आता वेळ आली आहे मंत्रालयावर कुच करायची. सरकार आम्हाला फिजिकली थांबवू शकते, पण आमच्या विचाराला थांबवू शकत नाही. रत्नागिरीत जेव्हा-जेव्हा तुम्हाला गरज लागेल, तेव्हा मी तुमच्या मदतीला धावून येईन. आता घाबरायचं कारण नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.