रत्नागिरी:- जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये ३५ वर्षे राजकारणात सक्रिय असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांचा पराभव लक्षवेधी ठरला. आपल्या राजकीय कारकिर्दीत अभ्यासू आणि स्पष्ट वक्ते सदस्य म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या उदय बने यांना या वेळी त्यांच्या स्वतःच्याच शिष्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
रचना महाडिक देखील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. रोहन बने देखील सभागृहात अनेक वर्षे होते. हे दिग्गज जिल्हा परिषद सभागृहाबाहेर झाले आहेत. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्यें मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उदय बने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यामुळे पक्षीय पाठबळाअभावी ते पराभूत झाले. अलिप्त भूमिकेमुळे राजकीय स्तरावर आवश्यक असलेले संघटनात्मक पाठबळ त्यांना मिळू शकले नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. एकटा माणूस राजकारणात पुढे जाऊ शकत नाही. पक्षाची साथ आवश्यक असते, हे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. ३५ वर्षांच्या त्यांच्या राजकीय कार्यात महत्त्वाचा टप्पा आल्याचे मानले जात असून, जिल्हा परिषदेत त्यांच्या अनुभवाची उणीव जाणवेल, अशी भावना व्यक्त होत आहे.









