रत्नागिरी:-येत्या पावसाळ्यात परशुराम घाटाच्या दुरुस्तीच्या कामानंतर सुरक्षेबाबत कोणतीही हमी देता येत नाही. त्यामुळे घाटातील वरच्या भागातील ११ आणि खालच्या भागातील ६० अशा एकूण ७१ घरांच्या स्थलांतराची तयारी ठेवण्याच्या सूचना संबधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने निवारा केंद्र उभारून त्या कुटुंबातील पूर्ण व्यवस्था करण्याचा निर्णय काल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच पर्यायी मार्गही सुस्थितीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.
अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट अतिशय धोकादायक बनला होता. वारंवार दरड कोसळून वाहतूक खोळंबा होत होता. येत्या पावसाळ्यामध्ये ते अतिशय धोकादायक ठरू शकते. त्यामुळे परशुराम घाटाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. घाटाच्या वरच्या भागातील दरडी कधीही घसरण्याची शक्यता होती. हा धोका कमी करण्यासाठी ती दरडी हटवण्याचे काम हाती घेऊन चौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले; मात्र काम सुरू असतानाच जेसीबी घसरून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एका कामगाराला जीव गमवावा लागला. दरडी हटवण्याचे काम मोठे होते आणि पावसापूर्वी ते पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे होते. त्यामुळे या घाटातील वाहतूक बंद करून हे काम वेगाने करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी घाटाच्या कामाची पाहणी करून पर्यायी मार्ग निश्चित केला. त्यानंतर ३ ते २५ मे पर्यंत परशुराम घाटातील वाहतूक सकाळी ११ ते सायं. ६ या दरम्यान बंद केली. त्यानंतर या वेळेत सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. निलम गोऱ्हे यांनी काल आढावा घेतला. त्याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, पावसापूर्वी पऱशुराम घाटातील काम पूर्ण होईल; मात्र ते तेवढे सुरक्षित असेल याची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व शक्यता गृहित धरून प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण तयारी ठेवली आहे. दरडी घसरण्याची शक्यता गृहित धरून घाटावरील ११ आणि खालच्या भागातील ६० घरातील कुटुंबीयांच्या स्थलांतराची तयारी ठेवली आहे. या कुटुंबीयांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी निवारा शेड उभारून त्या ठिकाणी त्यांची पूर्ण व्यवस्था करण्याची तयारी ठेवली आहे. पर्यायी रस्ताही सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत.