चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात विसावा पॉइंट येथे शनिवारी सकाळी ११ वाजता चालत्या ट्रकने पेट घेतला. या ट्रकमधील चालक व वाहकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी घेतली आणि स्वतःला वाचवले. या आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
चिपळूणहून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीकडे एमएच ०८, एच २२९१ या क्रमांकाचा ट्रक जात हाेता. परशुराम घाटातील विसावा पॉईंट येथे पोहाेचताच ट्रकच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. त्याचवेळी चालक व वाहकाने सावध होत ट्रकमधून बाहेर उडी घेतली. त्यानंतर काही क्षणातच ट्रकच्या समाेरील भागाला आग लागली. या आगीत ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबचलांब रांग लागली होती.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेचे अग्निशमन दल तेथे दाखल झाले. या दलाने काही वेळातच ही आग नियंत्रणात आणली. ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नुकसानाचा पंचनामा सुरु केला आहे.