परदेशातून जिल्ह्यात आलेले ८२९ जण अद्यापही ‘नॉट रिचेबल’ 

रत्नागिरी:- ओमीक्रॉनचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर परदेशातून येणार्‍यांवर आरोग्य विभाग कडक लक्ष ठेवत आहे. परदेशातून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ६९७ जणं आले आहेत. त्यातील १ हजार ८६८ जणांशी संपर्क झाला असून १ हजार ९८ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. अजुनही ८२९ जणांशी संपर्क झालेला नाही.

शिक्षण, नोकरीनिमित्त भारतातील अनेकजणं परदेशात वास्तव्यास आहेत. कोरोनातील परिस्थितीमुळे शिक्षण घेणारे तरुण देशात परतले होते. परिस्थिती निवळल्यानंतर ते माघारीही परतले; मात्र दुबई, ओमान, कुवेतसह आखाती देशांमध्ये अनेकजणं अजुनही नोकरी करत आहेत. यामध्ये कोकणातील अनेक तरुण तिकडे आहेत. सध्या काही तरुण माघारी परतू लागले आहेत. विमानतळावरुन आलेल्या नागरिकांची त्या-त्या जिल्ह्यात यादी पाठविली जाते. जिल्हा आरोग्य विभागाकडून त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाते. आठ दिवसानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तोपर्यंत त्या लोकांनी घरीच थांबावे अशा सुचना देण्यात येतात. आतापर्यंत २ हजार ६९७ जणं परदेशातून जिल्ह्यात आले. त्यातील १ हजार ८६८ जणांची संपर्क करण्यात आला आहे. तसेच १ हजार ९८ जणांचे आरटीपीसीआर अहवालही निगेटीव्ह आले आहेत. त्यातील फक्त तिघांचे नमुने कोरोना बाधित आले असून त्यांची जनुकीय चाचणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल दिल्लीतून येण्यासाठी अजुन दोन दिवस लागतील असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. परदेशातून आलेल्यांपैकी ३३३ जणांचा संपर्कच झालेला नाही. काहींजणं रत्नागिरीत आल्यानंतर अन्य जिल्ह्यात गेले आहेत. अशा लोकांची नावे त्या-त्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे पाठवली जात आहेत.