परदेशातून आलेल्या 1 हजार 695 जणांपैकी 588 जणांचा अहवाल निगेटिव्ह; 640 जणांचा शोध सुरू 

रत्नागिरी:- ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी परदेशातून आलेल्यांवर आरोग्य विभागाकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 695 जणं परदेशातून आले असून त्यातील 1 हजार 55 जणांशी संपर्क झाला. त्यातील 588 जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अजुनही 640 जणांशी संपर्क साधण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना व त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी तळागाळातील अधिकारी, कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. बुधवारी (ता. 22) झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य समितीमध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभुमीवर आढावा घेण्यात आला. जिल्हयात परदेशातून येत असलेल्या नागरिकांशी तत्काळ संपर्क साधला जात आहे. ज्या लोकांशी संपर्क साधला जातो त्यांची आठ दिवसांनी कोरोना चाचणी केली जाते. तोपर्यंत त्या लोकांनी घरीच रहावे अशा सुचना आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहेत. परदेशामधून येणार्‍यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत परदेशामधून आलेल्या एकाही नागरिकाची कोरोना चाचणी बाधित आलेली नसल्यामुळे जिल्हा ओमाक्रॉन मुक्त असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.