रत्नागिरी:- मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानूसार 1700 हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. शासकीय अदाजानुसार 1 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान शेतकर्यांना सोसावे लागणार आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यावेळी हा आकडा तिप्पट होईल अशी शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी परतीच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे घेतला. यावेळी कोकणातील कृषी विभागाच्या अधिकार्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत.
पावसातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. जिल्ह्यात 1700 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्यात नोंदले जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी तालुक्यात सध्या 300 हेक्टर नुकसान झाले असावे असा अंदाज आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यावेळी यामध्ये वाढ होऊ शकतो. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली शेती, कापून भिजलेले भात, भिजलेला पेंढा आणि पावसाने आडवं होऊन कोंब येण्याची प्रक्रिया अशा चार टप्प्यात नुकसानीचे सर्व्हेक्षण केले जात आहे.चौथ्या दिवशी जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णततः ओसरला आहे. शनिवारी (ता. 17) सकाळी कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला. तिन दिवसानंतरही जिल्ह्यातील नदी किनारी भागात असलेल्या शेतीत अजुनही चार ते पाच फुट पाणी साचलेले आहे. कातळावर कापून ठेवलेली शेती पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. उशिरा तयार झालेल्या गरव्या शेतीवर परिणाम होणार असून त्यात दाणेच शिल्लक राहणार नाहीत अशी स्थिती जिल्ह्यात आहे. कडकडीत ऊन पडल्यामुळे काही शेतकर्यांनी भिजलेले भात सुकवून झोडण्यास सुरुवात केली आहे; गावखडी येथे काही ठिकाणी अजूनही शेतात 3 ते 4 फूट पाणी असल्यामुळे ते कापणे अशक्य झाले आहे.