परतीच्या पावसाने जिल्ह्यातील 60 टक्के भातपीक धोक्यात 

रत्नागिरी:- गेल्या आठड्यात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील 60 टक्के भातपिक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जोरदार पावसामिुळे काही भागात कापणीला आलेली भातपिके परिपक्व झालेल्या लोब्यांच्या भारामुळे आडवी झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात गेले चार-पाच दिवस जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला.  जिल्ह्यात विजांच्या गडगडाटांसह परतीचा पाऊस सुरू झाला. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागर किनारी तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. लांजा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. चिपळण तालुक्यातील काही गावांना पावसाने चांगलेच झोडपले. सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही नद्यांचा जलस्तरही वाढला.

परतीच्या पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यातील 60 टक्क्यांहून अधिक भातशेती कापणीला आलेली आहे. नवरात्रोत्सवातून शेतकर्‍यांनी भातकापणीची पूर्वतयारी केलेली होती. मात्र, नवरात्रीच्या समारोपाच्या दिवसात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचा हिरमोड झाला आहे. हळवी भातपिके पूर्णतः परिपक्व झाल्यामुळे ती आता जमिनीवर कोसळू लागली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास या भातपिकांचे नुकसान होणार असल्यामुळे भात उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने भात पिकाची हानी होण्याच्या शक्यत्येने प्रत्येक तालुक्यात प्रातिनिधिक स्वरुपात पीकस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 60 टक्के भातपीक परिपक्व झाले आहे. 30 टक्के भातपीक येत्या आठ ते दहा दिवसांत परिपक्व होईल, त्यामुळे परतीच्या पावसाने उघडीप दिल्यास भातकापणी हंगामाला सुरुवात होईल.