१२१ हेक्टर क्षेत्र बाधित ; कापलेले भात भिजल्यामुळे नुकसान
रत्नागिरी:- मागील पंधरा दिवसात परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा दिला आहे. त्याचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला असून, जिल्ह्यात १ हजार शेतकऱ्यांचे सुमारे १२१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. पावसामुळे कापलेली भातरोपं भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
यंदा जिल्ह्यात ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. चार महिन्यात भातशेतीला पूरक वातावरण होते. त्यामुळे भात उत्पादन चांगले राहील, अशी शक्यता होती; मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरवात झाली आणि बळीराजाला फटका बसला. पावसाचा प्रभाव अजूनही सुरूच आहे. त्यामुळे भातकापणीचे वेळापत्रक बिघडले आहे. भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे उभे असलेले भातपिक आडवे झाले आहे. काहींनी पंचनाम्यांची वाट न पाहताच भात झोडून घेतले. अनेक ठिकाणी आडवं झालेल्या भाताच्या लोंब्या वाया गेल्या आहेत. जिल्हा कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार १ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात १२१ हेक्टरवरील शेतीचे १६ लाख ४७ हजार रुपयाचे नुकसान झालेले आहे. तालुकानिहाय झालेले नुकसान ः मंडणगड ४४.११ हेक्टर, दापोली ६.१० हेक्टर, खेड ११.८, चिपळूण २७.२८, गुहागर ६.८७, संगमेश्वर ३.३२, रत्नागिरी ६.९१, लांजा ७.२०, राजापूर ८.४५ हेक्टर.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी बाधित भातक्षेत्राचे पंचनामे करत बसण्यापेक्षा झोडणी करण्यावर भर दिला. परिणामी, त्यांच्या नुकसानीची पाहणीच झाली नाही. त्यामुळे कृषी विभागाचा अहवाल आणि प्रत्यक्ष नुकसान यामध्ये तफावत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या भात उत्पादनापेक्षा तीस टक्के नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.