राजापूर:- तालुक्यातील पन्हळे येथे रस्त्यावर अचानक बैल आडवा आल्याने कारचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कारचे नुकसान झाले. यानिमित्ताने मुंबई–गोवा महामार्गावर वाढत्या मोकाट जनावरांच्या समस्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्याचा फटका कधी वाहनचालकांना तर कधी जनावरांच्या जीवाला बसतो. मंगळवारी सायंकाळी राजापूर प्रांत कार्यालयासमोरील पुलावर झालेल्या अपघातात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा पन्हळे येथे अशीच घटना घडली.
एमएच 04 एक्स 8432 क्रमांकाची कार कुडाळवरून मुंबईकडे जात असताना राजापूर–पन्हळे दरम्यान अचानक रस्त्यावर बैल आडवा आला. प्रसंगावधान दाखवत चालकाने वेग कमी केला, तरीही बैलाला धडक बसली. धडक बसताच बैल पळून गेला मात्र कारचे मोठे नुकसान झाले. चालकाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.









