रत्नागिरी:- जीवनामध्ये पदासाठी कधी संघटनेत आलो नाही. फळ नाही मिळाले तरी चालेल पण, झाडाची सावली जिवंत ठेवण्यासाठी काम करत राहू. भविष्यात आयुष्यातील प्रत्येक क्षण शिवसेनेसाठीच राहील असे सांगत ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी भुमिका मांडली.
येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात मातोश्री स्वयंसेवी संस्थेच्या वतीने 60 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी मातोश्री श्रीमती प्रमिला विनायक बने यांचे साठ दिव्यांनी ओवाळून औंक्षण करण्यात आले. त्यानंतर उदय बने यांनी व्यासपीठावरून लोटांगण घालत आतापर्यंत जीवनात साथ देणार्या हितचिंतकांसह निकटवर्तीयांची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी श्री. बने यांनी आतापर्यंत अनेक अपघात, संकटातून सहीसलामत बाहेर पडत आजही भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक, मतदारांनी, जुन्या सहकारी मित्रांनी दिलेल्या पाठबळामुळेच खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. सर्वांच्या आशिर्वादामुळेच आपल्याला लढण्याचे बळ मिळाल्याचे सांगतानाच भविष्यातील प्रत्येक क्षण हा शिवसेनेसाठीची राहील असे त्यांनी जाहीर केले.
याप्रसंगी आमदार राजन साळवी यांनी बने सध्याच्या लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. माजी मंत्री रविंद्र माने म्हणाले, आज अनेकजणं केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावत असतात. पण उदय बने यांनी स्वतः केलेल्या कामाचे श्रेय दुसर्यांना दिले आहे. असा लोकप्रतिनिधी विरळच आहे. तर जिल्हाप्रमुख विलासा चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, तालुका संघटक प्रमोद शेरे यांनी श्री. बने यांना शुभेच्छा दिल्या.