पैसे घेतले नसतील तर न्यायालयामध्ये ते सिद्ध होईल: बावनकुळे
रत्नागिरी:- पत्राचाळमधील सहाशे जणांच्या तक्रारीवरुन खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली आहे. मराठी माणसांची फसवणुक करुन बँक खात्यात करोडो रुपये येत असतील आणि त्या संदर्भात चौकशी होणारच. जर यात काही गडबड नसेल, तुम्ही जर पैसे घेतले नसतील तर न्यायालयामध्ये ते सिद्ध होईल. ज्याला कर नाही त्याला डर कशाला, असा सल्ला भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, खासदार संजय राऊत यांची चौकशी ही आज अचानक झालेली नाही. हे पत्राचाळ प्रकरण आज काढलेे नाही. पत्राचाळ येथील सहाशे मराठी कुटूंबांच्या घराचा प्रश्न आहे. ती लोक रस्त्यावर आली आहेत. त्या मराठी माणसांनी केलेल्या तक्रारीवरुन कारवाई झाली आहे. लोकांची घरे खाऊन करोडो रुपये या नेत्यांच्या बँक खात्यात गेली आहे. ही तक्रार बावनकुळे, फडणवीस यांनी ईडकडे केलेली नाही. ईडीकडून त्यांना चारवेळा नोटीस गेली होती. पण त्यांनी काही केलेच नाही. ईडीच्या अधिकार्यांना हेलपाटे मारायला लावले. आता घरी आल्यावर आकांडतांडव कशाला करायचा. जर तुम्ही काहीच केलं नसेल तर घाबरता कशाला. आपल्याकडे लोकशाही आहे, देश कायदयाने चालतो. गडबड केल्याशिवाय कोण कोणाला अटक करत नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक यांनीही सुरवातीला मी काही केलं नाही असेच म्हटलं होते. त्याप्रमाणेच कारवाई झाल्यानंतर राऊत स्वतःला हिरो असल्यासारखे दाखवत मी काही केलं नाही सांगत आहेत.
भाजपवर होत असलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, पत्राचाळीतील सहाशे लोकांचे अर्ज आल्यानंतरच ही कारवाई झाली. राऊत यांच्या अटकेतनंतर महाराष्ट्र तुटतोय, महाराष्ट्रावर अन्याय होतो असा ओरडण्यात अर्थ नाही. कर नाही तर डर कशाला अशी भुमिका ठेवा. हे प्रकरण कोर्टात जाईल, दोन्ही बाजूने वकिल मते मांडतील. त्यानंतर योग्य काय ते न्यायालय ठरवेल. त्यासाठी आता आकाडतांडव करुन काहीच फायदा नाही. तुम्ही गडबड केली नसेल तर घाबरु नका. आधी चार्जशीट बघा, त्यामध्ये कोणते गुन्हे दाखल केले आहेत ते पहा. जर काहीच केलं नसेल तर महाराष्ट्र जयजयकार करेल, असा सल्लाही त्यांनी दिला.