रत्नागिरी:- पतीला कोणाचे मेसेज अथवा कॉल येतात हे पाहण्यासाठी पत्नीने पतीचा मोबाईल चेक केल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीला लाथाबुक्क्याने मारहाण करून तिच्या डोक्यात काठी मारून तिला गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील धामणसे लोगडेवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी गणेश लोगडे यांनी त्याबाबतची तक्रार दिली आहे. आपल्या पतीला मोबाईलवर कोणाचे फोन येतात व कोणाचे मॅसेज असतात हे पाहण्यासाठी पत्नी गौरीने आपल्या पतीचा मोबाईल चेक केला. त्यावेळी निता व तिची मुलगी वैशू यांचे नंबर कॉल लिस्टवर पाहिले. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटोदेखील पाहिले.
तुम्हाला एवढे फोन व फोटो कशासाठी येतात? अशी विचारणा गौरीने केली असता संतप्त झालेल्या गणेश याने तिला लाथाबुक्क्याने मारहाण करून जवळच असलेली काठी तिच्या डोक्यात मारून तिला जखमी केले. पती मारहाण करीत असतानाच तिने कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि तेथून धावतपळत आपल्या सासूकडे गेली. घडला प्रकार तिने आपल्या सासूला सांगितला.
याप्रकरणी गौरी गणेश लोगडे (वय २६ रा. धामणसे लोगडेवाडी) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी पती गणेश प्रभाकर लोगडे यांच्याविरोधात भादविक ३२४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पो. ना. खापरे करीत आहेत.









