पतितपावन मंदिरात भजनास मज्जाव केल्याप्रकरणी निषेध दिंडी

रत्नागिरी:- पतितपावन मंदिरात भजनाला मज्जाव केल्याप्रकरणात शनिवारी भजन मंडळांनी निषेध केला. मंदिरामध्ये भजन करुन निषेध दिंडी काढली.
रत्नागिरीतील प्रतितपावन मंदिरात भजन करण्यास भजनी मंडळींना नकार दिल्याप्रकरणी काही दिवसांपासून भजनी मंडळींमध्ये नाराजीचे वातावरण होते. यासंदर्भात पोलिसांकडेही अर्ज देण्यात आला होता. विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचा निषेध करीत शनिवारी भजनीबुवा व मंडळींनी एकत्र येत पतितपावन मंदिरात जावून देवतांची पूजा केली आणि भजन केले. त्यानंतर पतितपावन मंदिर ते सावकरचौक व त्याठिकाणाहून झाडगाव नाक्यापयर्र्त भजन म्हणत निषेध दिंडी काढली.

यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील अनेक भजनीबुवा सहभागी झाले होते. महिला भजनी मंडळींनीही या निषेध दिंडीत सहभाग घेतला. साईनाथ नागवेकर, जयवंतबुवा बोरकर, वासुदेव वाघेबुवा, सुदेश नागवेकर, मनोजबुवा भाटकर, विजय मयेकर, सावंतदेसाईबुवा, उल्हास लाडबुवा, श्रीराम नाखरेकर, राजू कीर, रघुवीर शेलार, सुधीर वासावे, बी.टी. मोरे, कौस्तुभ नागवेकर, नितीन तळेकर, बंटी कीर, अमृता मायनाक, सुषमा भाटकर, योगेश वाघधरे, बंड्या सुर्वे, किशोर मायनाक, संतोष चव्हाण, सुरेश शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक व भजनीमंडळी यावेळी उपस्थित होते. पतितपावन मंदिरापासून झाडगाव नाक्यापर्यंत भजन म्हणत दिंडी काढल्याने शहरवासियांचे लक्ष या निषेध दिंडीने वेधून घेतले.
यावेळी डिवायएसपी निलेश माईणकर, पोलीस निरिक्षक सतीश शिवरकर आदी उपस्थित होते.