किराणा दुकान मालकाचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील पडवे स्टॉप येथे सोमवारी, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजेच्या सुमारास एक मालवाहू ट्रक पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्याने फिर्यादी बाळकृष्ण सखाराम तांबे यांच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, ट्रक चालकाला किरकोळ दुखापत वगळता कोणतीही मोठी हानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, महमंद शाहिद रफिक (वय २८, रा. कोदापुर, ता. शिमोगा, जि. वसानगर, कर्नाटक) हा चालक आयसुलेट ट्रक (क्र. के.ए. २० एबी/४६७४) घेऊन चिरेखाण ते हातिवले असा प्रवास करत होता. पडवे स्टॉपजवळ आल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक थेट रस्त्याच्या खाली पलटी झाला.
अपघातामुळे परिसरातील बाळकृष्ण सखाराम तांबे (वय ६८, व्यवसाय-किराणामाल दुकान, रा. पडवे तुकरुलवाडी) यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर तांबे यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार, आरोपी चालक महमंद शाहिद रफिक याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्र. ६४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५, ३२४(४) सह मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किराणा दुकान मालक असलेल्या फिर्यादीच्या सामानाचे नुकसान आणि निष्काळजीपणामुळे स्वतःच्या किरकोळ दुखापतीस कारणीभूत ठरल्याबद्दल चालकावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या अपघातामुळे पडवे परिसरात काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. राजापूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.