पं.स.सदस्य प्रकाश गुरवनी मागितली खंडणी, मुलगा देखील सामील 

राजापूर पोलीस स्थानकात महानेटकडून अर्जाद्वारे तक्रार दाखल

राजापूर:-  राजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि  विद्यमान पं. स. सदस्य प्रकाश गुरव आणि त्यांचा मुलगा प्रसाद यांच्या विरोधात एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजापूर तालुक्यात महानेट फायबरचे काम सुरू आहे. तालुक्यातील सोलगाव ते देवाचेगोठणे या परिसरात काम सुरू आहे. हे काम लक्ष्मणराव दशरथ सुर्यवंशी (राहणार खेराडे वांगी, कडेगाव, जिल्हा सांगली) हे करत असून या कामात अडथळा आणल्याची व एक लाख रूपयाची खंडणी प्रकाश  गुरव यांनी मागितल्याची तक्रार एका तक्रार अर्जान्वये त्यांनी राजापूर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

सुर्यवंशी हे सदर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर असून त्यांनी सदर तक्रार अर्जामध्ये सोलगाव ते देवाचे गोठणे येथे काम सुरू असताना प्रकाश गुरव व त्यांचा मुलगा प्रसाद गुरव यांनी सदर ठिकाणी येवून आम्हाला शिवीगाळ व धमकी दिल्याची तकार दाखल केली आहे. दि. 22 व 23 एप्रिल रोजी शिवसेनेचे देवाचेगोठणे गणाचे पं. स. सदस्य आणि माजी उपसभापती प्रकाश गुरव व त्यांचा मुलगा प्रसाद या दोघांनी कामाचे ठिकाणी येवून सदर काम बंद पाडले आहे. तसेच सदरचे काम सुरू करावयाचे असल्यास एक लाख रूपये द्या, अशी मागणी केल्याचे त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्याबाबतचे प्रकाश गुरव यांच्याशी दुरध्वनी झालेले संभाषणही असल्याचे त्यांनी तकार अर्जात नमूद केले आहे.