रत्नागिरी:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता. 23) राजापूर, रत्नागिरी, देवरुख, खेड, चिपळूणात पावसाने हजेरी लावली; मात्र पंधरा ते वीस मिनीटांच्या सरी पडून गेल्यानंतर पुन्हा पावसाने एक्झीट घेतली. मोसमी पाऊस सुरु होणार अशी नागरिकांमध्ये निर्माण आशा काही काळाताच मावळली. हलक्या सरीनंतर दिवसभर पुन्हा उन्हाचा कडकडीत त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 4.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मंडणगड 5, खेड 4, गुहागर 19, लांजा 3 मिमी पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात 57.56 मिमी सरासरी नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 पासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यात पहाटेच्या सुमारास आणि दुपारी जोरदार सरी पडून गेल्या. आता पावस सुरु होईल अशी आशा बळीराजाला होती; मात्र थोड्याच वेळात आभाळ स्वच्छ झाले आणि सर्वांचाच हिरमोड झाला. सायंकाळीही ढगाळ वातावरण आणि वाराही वाहत होता. पण उशिरापर्यंत पाऊस पडला नाही. राजापूमध्येही दुपारी मुसळधार पावसाच्या सरींनी नागरिकांसह शेतकर्यांना दिलासा मिळाला होता. पावसाचा जोर थोडाच काळ टिकला. हा पाऊसही काही मोजक्याच महसल मंडळात पडल्यामुळे उर्वरित गावांमध्ये शेतकरी राजा आकाशाकडे डोळे लावूनच बसलेला आहे. देवरुखमध्येही दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. अचानक सुरु झालेल्या सरींनी बाजारपेठेतील व्यावसायीकांची तारांबळ उडाली. दुचाकी चालक, पादचारी पावसापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी थांबून होते. अशीच परिस्थिती चिपळूण तालुक्यातील कामथेसह आजुबाजूच्या परिसरात होती. खेड शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये हजेरी लावली होती. थोड्यावेळानंतर पावसाचा जोर ओसरलेला होता. पण दापोलीत ढगाळ वातावरण आणि पाणी शिंतडल्यासारखा पाऊस झाला. मंडणगड, लांजा तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. दिवसभर कडकडीत उन पडलेले होते.
कोट
सर्वत्र पाऊस पडला असता तरच त्याचा फायदा शेतकर्यांना होईल. अजुनही अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. अनेक ठिकाणी शेतजमीन कोरडीच आहे. पावसाचे पाणी भुगर्भात जिरुन शेतीला योग्य अशी जमीन होण्याएवढा पाऊस झालेला नाही.
- गजेंद्र पौनीकर, कृषी विस्तार अधिकारी