रत्नागिरी:- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासक कार्यरत असल्यामुळे जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतींचा 15व्या वित्त आयोगाचा सन 2022-23 बंधित आणि अबंधित निधी रोखून ठेवण्यात आला होता. आता मात्र लोकप्रतिनिधींची निवडणूक झाल्यानंतर हा निधी वितरित करण्यात आला आहे. यामुळे या नव्या सरपंचांना निधीची लाखो रूपयांची खुर्चीवर बसताक्षणी लॉटरी लागली आहे. जिल्ह्याला 7 कोटी 62 लाख रूपयांचा निधी मिळाला आहे.
केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी 2023 24 च्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्यापोटी राज्याला 712 कोटींचा निधी राज्याकडे प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यासाठी 16 कोटी 40 लाख रूपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनात ग्रा.पं. विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी लोकसंख्येनुसार हा निधी ग्रामपंचायतींना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे आता अबंधितच्या कामांना वेग येणार आहे.
जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने त्या वेळी तिथे प्रशासक होते. त्यामुळे बंधितचा हप्ता ’त्या’ ग्रामपंचायतींचा थांबविण्यात आला होता. मात्र आता निवडणुका संपल्यानंतर संबंधित ठिकाणी नवीन पदाधिकारी आले आहेत. त्यामुळे शासनाने मागील बंधितचा 4 कोटी 57 लाख आणि कालचा अबंधितचा 3 कोटी 5 लाखांचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
मंडणगड-निगडी, घराडी, दापोली-गावतळे, इनाम पांगरी, फणसू, नवसे, पाजपंढरी, खेड-देवघर, सुशेरी, नांदगाव, तळघर, वडगांव बुद्रुक, आस्तान, असगणी, तळवटपाल, चिपळूण-पिलवली तर्फे वेळंब, हडकणी, पोफळी, गुहागर-परचुरी, चिंद्रावळे, वेळंब, वेलदूर, अंजनवेल, संगमेश्वर-असुर्डे, आंबेडबुद्रुक, कोंडअसुर्डे, रत्नागिरी-फणसोप, शिरगांव, पोमेंडीबुद्रुक, चरवेली, लांजा-कोंड्ये, झापडे, गोविळ, कोलधे, उपळे, रिंगणे, वेरवली बु., प्रभानवल्ली, हर्चे, शिरवली, गवाणे, व्हेळ, देवधे, कोचरी, कोल्हे, राजापूर-सागवे, देवाचेगोठणे, केळवली, मोगरे, कोंड्येतर्फे सौंदळ, आंगले, भालावली, राजवाडी, मूर, वडदहसोळ यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अजूनही लांबणीवरच आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक असल्याने या संस्थांचा 10 टक्के प्रमाणचा बंधित आणि अबंधितचा हप्ता रोखून ठेवलेला आहे. परिणामी कालचा अबंधितचा निधीही झेडपीला मिळालेला नाही. त्यासाठी निवडणुकांची वाट पहावी लागणार आहे
ग्रामपंचायतींच्या आराखड्यानुसार अबंधित कामांसाठी हा निधी खर्च करावा लागणार आहे. यामध्ये गावातील आरोग्याच्या प्रश्नांवरील कामे, शैक्षणिक सुविधा, मागासवर्ग विकास, तसेच महिला बालकल्याण । विभागातील तरतुदींसह अन्य कामांवर हा खर्च करावा लागणार आहे