रत्नागिरी:- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात भारताची ताकद वाढवली आहे. यापूर्वी जगात भारताचे पंतप्रधान मागे असत. परंतु आज नरेंद्र मोदी पहिल्या रांगेत असतात ही नेतृत्वाची ताकद आहे. गेल्या दहा वर्षात देशभरात एकही बाँबस्फोट करण्याची हिंमत कुणी केली नाही. पुलवामामध्ये प्रयत्न केला गेला. परंतु भारताने तात्काळ उरीमध्ये घुसून 350 जणांना संपवले. ही ताकद केवळ नरेंद्र मोदींमध्ये आहे. मनमोहन सिंगांनी ही हिंमत केली असती का? असा प्रश्न उपस्थित करत बाळासाहेबांच्या विचारांना विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या बाजुला उद्धव ठाकरे बसले आहेत. त्यांना कोणाचीही सहानुभूती नसल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला उमेदवार नारायणराव राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब माने, शिवसेना नेते किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख महेश म्हाप, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री.विनोद तावडे म्हणाले, 370 कलम रद्द करण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार शिवतीर्थावरून केली होती. ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पूर्ण केली. भारतीय जनता पार्टी घटना बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. परंतु उद्धव ठाकरे ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्या काँग्रेसने तब्बल 80 वेळा घटना दुरूस्ती घटनेला बदलण्याचा प्रयत्न केला होता, याचा विसर उद्धव ठाकरेंसहीत विरोधकांना पडला आहे का? असा प्रश्न श्री.तावडे यांनी उपस्थित केला.
बाळासाहेबांचे हिंदुत्व जपण्याचे काम शिंदेंची शिवसेना व भाजपच करत आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव व फोटो लावण्याचा अधिकार आम्हालाच आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना नेहमीच विरोध केला त्या काँग्रेसवाल्यांसोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही असा टोला श्री.तावडे यांनी लगावला.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीच येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परंतु असे असले तरी कार्यकर्त्यांना घरी बसून चालणार नाही. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत उन्हाचा कडाका जास्त आहे. परंतु संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचणाऱ्या नरेंद्र मोदींसाठी दिवसातील एक तास आपण दिला पाहिजे. प्रत्येक मतदारांपर्यंत एक नाही तर तीनवेळा पोहोचले पाहिजे. देशाचे सक्षम नेतृत्व करण्याची ताकद केवळ नरेंद्र मोदींमध्येच आहे हे आपण जनतेला पटवून सांगताना त्यांनी केलेल्या कामांची उदाहरणे द्या असे आवाहन श्री.तावडे यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी लांजामधील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये वाकेड ग्रा. पं. सदस्य लक्ष्मी बराम, स्नेहा पांचाळ, वाघणगाव सरपंच सिद्धी जबरे, उपसरपंच अरूण जाधव, गव्हाणे ग्रा.पं.चे दीपक दाभोळकर, प्रशांत कोटकर, अस्मिता दाभोळकर, शाखाप्रमुख विलास दाभोळकर, युवा सेना तालुकाप्रमुख धमेंद्र दाभोळकर, गटप्रमुख सुरेश दाभोळकर, विश्वनाथ शिंदे, महिला शाखा संघटक तन्वी दाभोळकर, प्रमोद डोंगरे, सुनिल दाभोळकर, अजय दाभोळकर, तानाजी दाभोळकर, रवींद्र दाभोळकर, मयुर दाभोळकर यांचा समावेश आहे.









