रत्नागिरी:- पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये दिले जात आहेत. मात्र या योजनेचा लाभ काही आयकर दाते तसेच शासकीय कर्मचारी घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गेल्या वर्षीपासून जिल्ह्यातील ५ हजार ४१५ शेतकऱ्यांकडून दिलेले पैसे वसूल केले जात आहेत. आतापर्यंत १ हजार १६४ जणांनी १ कोटी ३ लाख ५६ हजार परत केले.
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत चार महिन्यांनी दोन हजार रूपये म्हणजेच वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रूपये पेन्शन देण्याची योजना केंद्र शासनाने २०१९ साली सुरू केली. जिल्ह्यात या योजनेचे २,६९,०८३ लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी आयकर दाते आणि शासकीय कर्मचारी घेत असल्याचे निदर्शनात आल्याने अशांकडून घेतलेल्या निधीची रक्कम भरून घेण्याची कारवाई सुरू आहे. यापैकी आयकर दाते असलेल्या ४८८४ लाभार्थ्यांकडून आतापर्यंत २६,००३ हप्ते मिळाले आहेत. तर अन्य अपात्रांकडून येणे बाकी आहे. जिल्ह्यात सन्मान योजनेचे २ लाख ५ हजार १४८ लाभार्थींपैकी आयकर दात्यांसह अपात्र ठरलेल्या ५ हजार ४१४ पैकी ४ हजार ८८२ जणांकडून वसुली झाली आहे. वसुलीसाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडून वारंवार नोटीस पाठविल्या जात आहेत. मात्र अजूनही वसुली होणे बाकी आहे. २०१९ साली शेतकऱ्यांसाठी वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपयांची पेन्शन दिली. अपात्र ठरलेल्या काही लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अशा लाभार्थ्यांकडे असलेल्या वसुलीत अडचणी येत आहेत. काही लाभार्थींनी रक्कम ऑनलाइन भरणा केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.