न्यायासाठी दर्यासारंग मच्छिमार भोई समाजाचे उपोषण

खेड:- लोटे परशुराम औद्योगिक कारखान्यांचे रासायनिक विषारी पाणी शुद्धीकरण न करता सोनपात्र नदीतून जगबुडी व वाशिष्टी खाडीत सोडले जाते. त्याबाबत लेखी तक्रारी करुन सुद्धा कोणीही दखल घेत नव्हते. या विरोधात दर्यासारंग मच्छिमार भोईसमाज उत्कर्ष मंडळातर्फे शुक्रवारी (ता. 2) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करण्यात आले.

गेल्या 30 वर्षापासून लोटे परशुराम औद्योगिक कारखान्यांचे रासायनिक विषारी पाणी शुद्धीकरण न करता सोनपात्र नदीतून जगबुडी व वाशिष्टी खाडीत सोडले जाते. त्याबाबत लेखी तक्रारी करुन सुद्धा कोणीही साधी दखल घेत नाही. त्यामुळे आतापर्यंत स्थानिक भोईबांधवांचा मच्छि व्यवसाय कायमचा नष्ट झाला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई सुद्धा दिलेली नाही. यामध्ये स्थानिक भोई बांधवांवर अतिशय अन्याय होत आहे. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक दिवसाचा उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज आंदोलन करण्यात आले. पिडीत बांधवांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम भरली जावी, वस्तीतील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला कंपनी पेरोलवर कायम स्वरुपी नोकरी, कंत्राटींना कायम स्वरुपी नोकरी, दैनंदीन नुकसान म्हणून महिना 40,000 रुपये मिळावेत. येथील फळबागा आणि शेतीही नष्ट होत आहे. विहीरीतील पिण्याचे पाणी दुषित झाले आहे. त्याची भरपाई मिळावी. लोटे परशुराम औद्योगिक कारखान्याचे पाणी अरबी समुद्रात सोडण्याची व्यवस्था करावी. लोटे औद्योगिक वसाहतीचे स्वत : चे रुग्णालय आहे, त्यात भोई समाजातील बांधवांना मोफत उपचार व्हावेत व त्यांच्याकरीता येण्या- जाण्यासाठी एक रुग्णवाहीका मिळावी. दर्यासारंग संस्थेतील स्थानिक भोईबांधवांसाठी होड्या व जाळी उपलब्ध करुन द्यावीत, मुलांसाठी शैक्षणिक मदत मिळावी, प्रत्येक गावात फिरता दवाखान्याची सोय करावी, पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेलची व्यवस्था करावी, शहरापासून जोडल्या जाणार्‍या भोईसमाजातील वस्त्यांमध्ये रस्ता डांबरी करावा, प्रत्येक गावांना जोडणार्‍या नद्या-नाले यांच्यामध्य मोठे साकव तसेच पुल बांधावेत या मागण्या करण्यात आल्या.