नोंदणी रद्द झालेल्या गृहप्रकल्पांबाबत आक्षेप घेण्यासाठी आज अखेरचा दिवस

रत्नागिरी:- कोकणातील 47 महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. या प्रकल्पांची यादी महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी 7 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. जुन्या प्रकल्पांबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी 17 जूनपर्यंत असलेली मुदत दि. 7 जुलै अशी करण्यात आली आहे.

नवीन गृहप्रकल्पांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे तर विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करणेही विकासकांसाठी बंधनकारक आहे. जे विकासक वेळेत प्रकल्प पूर्ण करत नाहीत किंवा नोंदणीची मुदत संपते त्या प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याची तरतूद रेरा कायद्यात आहे. आता महारेराने एका परिपत्रकाद्वारे अव्यहार्य आणि कधीही पूर्ण होऊ न शकणार्‍या प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरु झाली असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात महारेराने अशा प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
शून्य नोंदणी, निधी उपलब्धता नसणे, प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असणे, न्यायालयीन खटले, कौटुंबिक वाद, नियोजनाबाबत शासकीय नवीन अधिसूचना या आणि अशा काही कारणांमुळे पूर्ण होऊ न शकणार्‍या प्रकल्पांचा यात समावेश आहे.
या प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी महारेराने दि. 17 जूनपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले होते. मात्र, विहित मुदतीत एकही आक्षेप नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यासाठी आणखी एक संधी ग्राहक आणि संबंधितांना देण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. त्यानुसार ही मुदत आता दि. 7 जुलै अशी करण्यात आली आहे. आक्षेप न आल्यास नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. यामध्ये कोकणातील ठाण जिल्ह्यातील 12 , रायगडमधील 16, पालघर जिल्ह्यातील 6, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर अनुक्रमे 5 आणि 4 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 आणि रत्नागिरी एका प्रकल्पाचा समावेश आहे.