नेवरे-भंडारपुळे मार्गावर दरड कोसळली; खेड येथे 7 कुटुंबांचे स्थलांतर

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुना, बावनदी, काजळी यासह मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. खेड तालुक्यातील खोपी-जांभुळवाडी येथे दरड कोसळण्याच्या भितीने 7 कुटूंबातील 24 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तर नेवरे-भंडारपुळे रस्त्यावर दरड कोसळली आहे. परंतु रस्ता वाहतुक सुरळीत आहे.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. 30) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 60.56 मिमी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 47, दापोली 49, खेड 16, गुहागर 33, चिपळूण 68, संगमेश्‍वर 41, रत्नागिरी 77, लांजा 145, राजापूर 69 मिमी नोंद झाली. 1 जूनपासून आतापर्यंत 648 मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारी दिवसभर पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांची पाणीपातळीत वाढ झाल्याने किनारी भागातील लोकांना सुरक्षितेचे आवाहन करण्यात आले आहे. धरणंही भरु लागली आहेत. पावसामुळे खोपी-जांभीळवाडीत सकाळी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेथील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामध्ये 7 कुटुंबांचा समावेश आहे. त्यामध्ये 24 लोकांचा समावेश असून 15 मोठी तर 9 लहान मुले आहेत. तसेच दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातील जिल्हा परिषद शाळाही स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात रस्त्याला मोठी भेग गेली आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून घटनास्थळाची पाहणी केली आहे.