नुकसानीचा आकडा वाढताच; आतापर्यंत एक हजार कोटींची हानी 

रत्नागिरी:-मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या महापुरासह दरडी कोसळल्यामुळे सुमारे एक हजार कोटींंचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान चिपळूण आणि खेड तालुक्यातील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत 25 हजार मालमत्तांचे पंचनामे करण्यात आले.

ढगफुटीसारख्या पावसामुळे २२, २३ जुलैला जिल्ह्याला महापूराचा फटका बसला. वाशिष्ठीच्या पुरामुळे चिपळूण शहर दोन दिवस तर जगबुडीच्या पुरात खेड शहर पाण्याखाली होते. पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरवात झाली. बाधितांना मदत करण्यासाठी हजारो लोकांनी हात पुढे केले होते. गेले आठ दिवसत महसुल विभागाची सर्व यंत्रणा पंचनाम्यांसाठी लावण्यात आली होती. यामध्ये चिपळूण शहराला मोठा तडाखा बसला आहे. चिपळूण शहरातील ९ हजार २७३ घरांचे तर ४ हजार ३५९ व्यापार्‍यांच्या दुकानांचे नुकसान झाले आहे. दोन्ही शहरांबरोबरच संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर आणि लांजा तालुक्यातही पूर परिस्थिती होती. पूर्णतः १०६ घरे, अंशतः २ हजार ८१४ घरे, ६७ झोपड्या आणि ३६६ गोठ्यांचा समावेश आहे. चिपळूण तालुक्यातील ०.१० हेक्टरवरील मत्स्यशेतीला पुराचा फटका बसला आहे.

दरडी कोसळून आणि पुरामध्ये वाहून गेल्यामुळे जिल्ह्यातील ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ३२ व्यक्ती या दोन शहरातील आहेत. सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, जिल्हा परिषद मिळून २५ हजार मालमत्तांचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे सुमारे ८० कोटीपेक्षा अधिक नुकसान आहे. पुरात महावितरणचे विद्युत खांब, विज वाहीन्या यांच्यासह ट्रान्स्फॉर्मरचे मिळून ३ कोटी ४५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ११ कुक्कुटपालन शेडसह २१३ शेतकर्‍यांकडील ३ हजार २७४ कोंबड्या मृत पावल्या आहेत. सव्वा तिनशे गाई-गुरे मृत पावले आहेत. चिपळूण शहरातील दुचाकी, चारचाकी गाड्या वाहून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. दोन दिवस पुराच्या पाण्यात उभी राहिल्यामुळे सुमारे ५ हजार वाहने बाधित झालेली आहेत. नदी किनारी भागातील पुरामुळे पावणेदोन हजार हेक्टरवरील भातशेती वाहून गेली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १० हजार ५७३ कुटूंबे पात्र ठरली आहेत. ५ कोटी २८ लाख ६५ हजार रुपये यासाठी लागणार आहेत. प्रशासनाकडून याचे वितरण सुरु करण्यात आले आहे.