नुकसानग्रस्त कुटुंबाला पाच हजारांचे सानुग्रह अनुदान 

रत्नागिरी:- अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण, खेडला बसला होता. बाधित कुटूंबातील ज्यांची भांडी, कुंडी व कपडयांचे नुकसान झाले, त्यांना कुटुंबामागे 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात 22 व 23 जुलैला निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका चिपळूण, खेड शहरांना बसला. वाशिष्ठी, जगबुडीच्या पुरामध्ये अनेक कुटूंबांमधील घरातील सर्वच साहित्य वाहून गेले. अचानक पूर आल्यामुळे हो गोंधळ झाला होता. अनेकांनी घरातील साहित्य जागेवरच सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होणे पसंत केले. काहींनी घराच्या माळ्यावर बसून दोन दिवस काढले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर घरातील सर्वच साहित्य वाहून गेल्यांची संख्या अधिक आहे. चिपळूण शहरात हे प्रमाण तुलनेत सर्वाधिक आहे. राज्य शासनाकडून त्यांना तत्काळ मदतीसाठी पावले उचलण्यात आली आहेत. पुरामुळे बाधित व्यक्तींचे मालमत्तेचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाना मदत सुरु करण्यात आली आहे. त्यात जखमी झालेल्या व्यक्तींनाही मदत देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

पुरामध्ये ज्या नागरिकांचे भांडी, कुंडी व कपडयांचे नुकसान झाले, त्यांना कुटुंबामागे 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्हयात 57 ठिकाणी 1 हजार 712 लोक सुरक्षित ठिकाणी आश्रयास आहेत. त्यांची निवास, भोजन, पिण्याचे पाणी व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित 25 हजार 665 लोकांना शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण 104 सामाजिक संस्था व 21 व्यक्तींनी पूरग्रस्त भागासाठी प्रशासनामाफत मदत केली आहे.