देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथे झालेल्या घरफोडी चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. मात्र श्वान पथक घरामागील काजू बागेत घुटमळले.
निवे बुद्रुक तेली तांबलवाडी येथील रहिवासी राजाराम चौगुले हे कामानिमित्त बाहेर गेले असता चोरट्यांनी भर दिवसा डल्ला मारून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १ लाख ६७ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. चौगुले घरी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. मात्र श्वान पथक घरामागील काजू बागेत घुटमळले. भर दिवसा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. हा चोरटा माहीतगार असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.