रत्नागिरी:- राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदार संघात निवेंडी, रिळ-उंडी, विस्तारीत रिळ आणि वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित असून याठिकाणी भूसंपादनासाठी जवळपास 2300 कोटींची आवश्यकता आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रकल्पांमधून हजारो बेरोजगार तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे महानगरांसह बाहेर गावी जावू नये यासाठी कोकणात उद्योग उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. उद्योगमंत्री झाल्यानंतर गेली अनेक वर्ष लोटे परिसरात रखडलेला कोकाकोला प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले. निवडणुकीपूर्वीच सेमीकंडक्टर प्रकल्प, हत्यारे तयार करण्याचा कारखाना, मँगो-काजू पार्क यासारखे प्रकल्प आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. यातील सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी चंपक मैदान येथे शेकडो एकर जागा त्यांनी उपलब्ध करुन दिली. हा प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे. तत्पूर्वी स्कील कर्मचारी मिळावेत यासाठी टाटाच्या माध्यमातून स्कील डेव्हलपमेंट सेंटर सुरु होत आहे.
या प्रकल्पांसाठी आवश्यक जागांचे भूसंपादन सुरु झाले आहे. यातील निवेंडी, रिळ-उंडी येथे एमआयडीसीने भूसंपादन सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. येथील जागेसंदर्भात डिपीआर तयार करण्याचे काम सुरु असून स्क्रुटीनी करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रकरणे पाठवण्यात आली आहेत. या दोन ठिकाणी जवळपासून 314 हेक्टरहून अधिक जागेचे संपादन होणार असून त्यासाठी 350 कोटींची आवश्यकता आहे. मागील दीड वर्षापासून यावर एमआयडीसी विभागाकडून काम सुरु आहे. रिळ येथे अधिक 72 हेक्टर जागेची आवश्यकता असून त्यासाठी 80 कोटींची आवश्यकता आहे.
वाटद एमआयडीसीसाठी आतापर्यंत 904 हेक्टर जागेची मोजणी पूर्ण झाली असून त्यासाठी 660 कोटी लागणार आहेत. याच ठिकाणी आणखी एक हजार हेक्टरची आवश्यकता आहे.या चारही एमआयडीसीसाठी जवळपास 2300 कोटींची आवश्यकता लागणार आहे. रिळ-उंडी व निवेंडीसाठी आवश्यक निधीची बजेट तरतूद मात्र 2026-27मध्ये करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात लवकरच नवीन प्रकल्प येणार असल्याने, यातून हजारो तरुणांना रोजगार उद्योगांमधून उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी वरिष्ठ कार्यालयात करण्यात आली असल्याचे एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे यांनी सांगितले.









