निवळी येथे लक्झरी बसच्या धडकेत प्रौढाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील सुतारवाडीजवळील वळणात काळ्या रंगाच्या लक्झरी बसच्या धडकेत नेपाळी प्रौढाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना मंगळवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 वा.सुमारास घडली.याप्रकरणी अज्ञात लक्झरी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दल बहादूर मेघी भंडारी (55,मुळ रा.नेपाळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत त्याचा जावई प्रकाश गंगाराम ओली (45,रा.नेपाळ) याने पोलिसांना खबर दिली आहे.त्यानुसार,प्रकाश आज सकाळी आपले कुटूंबिय आणि सहाकार्‍यांसोबत पांगरीतून निघून रत्नागिरीत चालत येत होता.रत्नागिरीतून पुढे ते सांवतवाडीत जाणार होते.

सकाळी 6.30 वा.सुमारास हे सर्व निवळी-बावनदीजवळील सुतारवाडी येथील वळणात आले असता पाठीमागून येणार्‍या अज्ञात काळ्या रंगाच्या लक्झरी बसने दल बहादूरला पाठीमागून धडक दिली.ही धडक इतकी जबदरस्त होती कि,त्यात दल बहादूर भंडारीचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान धडक दिल्यानंतर लक्झरी बस चालकाने तेथील धुक्याचा फायदा उठवत पळ काढला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन निवळीतील स्थानिक तरुणांच्या मदतीने उत्‍तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीणचे पोलिस हेड काँस्टेबल झगडे करत आहेत.