रत्नागिरी:- निवळी – करबुडे मार्गावर 28 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वा. च्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना घडली होती. अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार अभिषेक उर्फ स्वप्नील वायंगडेकर (41, बावनदी निवळी रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबतची फिर्याद जहांगीर मुल्ला याने ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 नोव्हेंबर रोजी रात्री अभिषेक वायंगडेकर हा आपल्या दुचाकीवरुन जहांगिर आदम मुल्ला (37, ट्रक मॅकेनिक, रा. साहील शांती धाबा करबुडे) व राजू शेख याला घेउन निवळी ते करबुडे असा जात होता. यावेळी निवळी येथील पाण्याची टाकी येथे दुचाकी आली असताना ताबा सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला चरात दुचाकी पडली. यात दुचाकीवरील राजू शेख (40, कोल्हापूर) याचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार अभिषेक हा स्वतः आणि जहांगिर मुल्ला जखमी झाले. एकाच्या मृत्यूस आणि स्वतःच्या व दुसर्याच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार अभिषेक वायंगडेकर याच्यावर भादविकलम 304 (अ), 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.