धक्कादायक वास्तव, स्पीडब्रेकर बसविण्याची स्थानिकांची मागणी
रत्नागिरी:- गेल्या दोन महिन्यामध्ये मुंबई-गोवा
महामार्गावरील निवळी येथील त्या धोकादायक वळणावर २३ अपघात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांकडे गतिरोधक (स्पीडब्रेकर) घालण्याबाबत मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते. अवजड वाहनांच्या वेगावरही कोणाचे नियंत्रण नसल्यामुळे ग्रामस्थांनी आरटीओ कार्यालयाकडे बोट दाखवले आहे.
निवळीतील अपघातानंतर महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला गेला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पर्यटकांचा, नियमित वाहतूक करणाऱ्यांचा खोळंबा झाला. चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना खासगी मिनी बसला गो कंपनीच्या एलपीजी गॅस भरलेल्या टँकरने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर घटनास्थळावरील अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत.
निवळी घाटातील ज्या धोकादायक वळणावर हा अपघात झाला, तिथे गेल्या दोन महिन्यांमध्ये २३ अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. याबाबत उपसरपंच निवळकर यांनी पोलिस अधीक्षकांना अधीक्षकांना पत्र दिले होते. तसेच तिथे उपाययोजना करण्याची मागणीही केली होतो. परंतु, गतिरोधक न टाकल्यामुळे त्या वळणावर अपघात घडत आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. अपघात होऊन चोवीस तास लोटल्यानंतर कंपनीच्या कायदेशीर सल्लागार शुभांग सिंग यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरीत कोसळलेल्या बसची पाहणी केली. त्यानंतर घरांची आणि झोपडीचीही पाहणी केली.
भाजप नेत्यांची तक्रार
भीषण अपघाताची आणि गॅस गळतीनंतर निर्माण झालेली परिस्थिती स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आदींनी जीव धोक्यात टाकून नियंत्रणात आणली होती. जखमीना बाहेर काढण्यात मदत केली. परंतु पोलिस अधीक्षकांनी स्थानिकांवरच लाठ्या उगारल्या. तू आम्हाला नेतेगिरी शिकवू नकोस, असे बोलून आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे गावातील सर्व स्थानिक लोकांची मने दुखावली आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या वागणुकीबद्दल कारवाई करावी, अशी तक्रार भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी पोलिस महानिरीक्षकांकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी दिले आहे.