रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-बावनदी रस्त्याच्या वळणावर जयगडहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये उत्तर प्रदेश येथील तरुण चालक गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
सुभाष जगतपाल वर्मा (वय २३, रा. बंन्डा, उत्तरप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ५) सकाळी पावणेसातच्या सुमारास निवळी बावनदी येथील वळणावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत चालक सुभाष वर्मा हा ट्रक (क्र. एमएच-४६ बीबी १५३७) गॅस सिलेंन्डर घेऊन मुंबईकडे जात असताना निवळी-बावनदी वळणावर त्याचा ट्रकवरिल ताबा सुटून अपघात झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक नितीन कदम, पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे हे घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रक रस्त्याच्याकडेला आडवा झाल्याने चालक केबीनमध्ये अडकून पडला होता. तो गंभीर जखमी झाला होता त्याला पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील करत आहेत.









