निवळी-जयगड रस्त्यावर दोन मोटारीत अपघात

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर तिवराट पोलिस चेकपोस्ट जवळ दोन मोटारीमध्ये अपघात झाला. या अपघात प्रकरणी संशयित मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम अनिल भोसले (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) असे संशयित मोटर चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी साडेबाराच्या सुमारास तरवळ चेकपोस्ट येथील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बापू दिनकर कांबळे (वय ३६, रा. वाघवे, ता. पन्हाळा. जि. कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील मोटार (क्र.एमएच-११ ए. डब्ल्यू ८७१२) ही वाघवे कोल्हापूर ते गणपतीपुळे अशी घेऊन जात असताना निवळी ते जयगड रस्त्यावरील तिवराट पोलिस चेकपोस्ट येथे वळण घेत असताना समोरुन येणारी मोटार (क्र. एमएच-१५ जे आर ५८००) वरील संशयित चालक शुभम भोसले याने रस्त्याच्या उजव्या बाजूला आणल्याने फिर्यादी बापू कांबळे यांच्या मोटारीला धडक होऊन अपघात झाला. या प्रकरणी बापू कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.