रत्नागिरी:- जयगडहून मुंबईकडे निघालेला एक कंटेनर रत्नागिरी-बावनदी रस्त्यावर पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना निवळी-बावनदी येथील सुतारवाडीमधील एका उतारावर आणि वळणावर घडली. एम.एच. ४६ बी.बी. १५३७ क्रमांकाचा हा कंटेनर जयगड बंदरातून मुंबईच्या दिशेने जात होता. याच वेळी, चालकाचा निष्काळजीपणा आणि भरधाव वेगामुळे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि तो पलटी झाला.
या अपघातामध्ये कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. कंटेनर चालक सुभाष जगतपाल वर्मा (वय २३, रा. बंन्डा, खुटार, छातरपुर, प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा यात जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची तक्रार पोलीस पाटील संजना संजय पवार यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी भा.दं.वि. अधिनियम २०२३ नुसार कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मो.वा.का.क. १८४ अंतर्गत गु.र.क्र. १६७/२०२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.