रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्ह्यात आलेले ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे यांनी निवडणूक व व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. निवडणूक व महसूल विभागाने यात अत्यंत नियोजनबध्द काम केले. निवडणूक कर्मचार्यांना ट्रेनिंगपासून मतमोजणीपर्यंतच्या कार्यक्रमात कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. एमएमआरडीएचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे यांनी मतदानच्या एक दिवस आधी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. रत्नागिरीतील सामाजिक न्याय भवन येथील मतमोजणी केंद्राची पाहणी केली. मतपेट्या ठेवण्याच्या स्ट्रॉग रुमची व्यवस्थाही त्यांनी पाहिली.
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये व टिके या ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवरही भेट दिली. या वेळी त्यांनी एकूण सोयींबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत रत्नागिरीच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव उपस्थित होते.









