मुख्यमंत्र्यांच्या ५३ सभांचा महायुतीला मोठा फायदा
रत्नागिरी:- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या विजयाचा मोठा दावा केला आहे. राज्यात आकडेवारीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) सर्वात पुढे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री सामंत म्हणाले की, महायुतीचा प्रचार अत्यंत प्रभावी ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात तब्बल ५३ जाहीर सभा घेतल्या असून २३ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण केला आहे. या व्यापक प्रचारामुळे शिवसेना, युती आणि महायुतीला निश्चितच मोठा फायदा होईल. स्वतः सामंत यांनी ७ ते ८ जिल्ह्यांमध्ये ३६ सभा घेतल्याची माहिती दिली. राज्यात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तीन प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची मोहीम सुरू असून, यामध्ये शिंदे सेना आघाडीवर राहील.
महायुती सरकारच्या विविध योजनांचा फायदा निवडणुकीत होईल, असे सामंत म्हणाले. ‘बहीण’, ‘दीदी’, ‘एसटी’, ‘स्वयंरोजगार’ आणि ‘मोफत शिक्षण’ यांसारख्या योजनांमुळे युतीला मोठा आधार मिळाला आहे.
प्रचारादरम्यान कोणत्याही नेत्यांवर टीका-टिप्पणी केली नाही. केवळ विकासावर लक्ष केंद्रित केले. विशेषतः सिंधुदुर्गात विकासाविषयी बोलले, असा उल्लेख त्यांनी केला. या जिल्ह्यात युती/महायुती सात जागांवर विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महायुतीमध्ये एकोपा टिकायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यात ‘मैत्रीपूर्ण लढती’ झाल्या असल्या तरी एकत्रितपणे महायुती सत्तेवर येईल.
सामंत यांनी यावेळी विरोधी पक्ष महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वीच हार स्वीकारली आहे, अशी टीका त्यांनी केली.









