दाभोळ:- नगरपंचायत निवडणुकीनंतर विहित कालावधीत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या १४ उमेदवारांना पुढील ३ वर्षांसाठी अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दिले आहेत.
नगरपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यावर ३० दिवसाच्या आत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने निवडणुकीसाठी झालेला खर्च व शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा असतो; मात्र या उमेदवारांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर ३० दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च व शपथपत्र सादर केले नाही. त्यानंतर या उमेदवारांना खुलासा करण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस देऊन त्यासाठी सुनावणीही आयोजित केली होती; मात्र नोटीस मिळाल्यावर या उमेदवारांनी खुलासाही सादर केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी महाराष्ट्र नगर पालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १६ (१ ड) (ब) नुसार या १४ उमेदवारांना ३ वर्षासाठी अपात्र घोषित केले आहे; मात्र हे सर्व उमेदवार निवडणुकीत पराभूत झालेले असल्याने नगरपंचायतीमधील एकही पद रिक्त होणार नाही.
खर्च सादर न केल्या प्रकरणी काझी इस्माईल (प्रभाग क्र. ३), जहीर तळघरकर (प्रभाग क्र. ४), किरण घोरपडे (प्रभाग क्र. ९), विशाखा पवार (प्रभाग क्र. १२ व १५), मृणाली सोंडकर (प्रभाग क्र. १२), वृषाली कदम (प्रभाग क्र. १५) या उमेदवारांनी दापोली नगरपंचायतीची निवडणूक लढवून खर्च सादर केला नव्हता तर सुमित्रा निमदे (प्रभाग क्र. १), विजय पोटफोडे (प्रभाग क्र. ४), संजय राणे (प्रभाग क्र. ४), अनुराग कोळंबेकर (प्रभाग क्र. ५), महेंद्र सापटे (प्रभाग क्र. ७), मंदार वारणकर (प्रभाग क्र. १०), सोनाल पवार (प्रभाग क्र. १७) या उमेदवारांनी मंडणगड नगरपंचायतीची निवडणूक लढवून खर्च सादर केला नव्हता.