रत्नागिरी:- जिल्हा परिषद गट व गणांचे प्रारूप आराखडे तयार करून पाठवा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने एका पत्राद्वारे जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. त्यासाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून रत्नागिरी जिल्ह्याची तपासणी ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर अंतिम आराखडे निवडणुक आयोगाला सादर केले जाणार आहेत. ही प्रक्रिया चालू झाल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका एप्रिलपर्यंत होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक वर्षाच्या आधीच्या वर्षी साधारणपणे ऑक्टोबरमध्ये प्रारूप गट रचना कार्यक्रम जाहीर केला होतो. ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्र देऊन गट व गणांची प्रारूप रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर डिसेंबरमधील विधिमंडळ अधिवेशनात जिल्हा परिषद अधिनियम १९६२ मध्ये बदल करून जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान ५५ व अधिकाधिक ८५ करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत २९ जानेवारीस अध्यादेश जारी केला. यावर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्ह्यांमधील जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून १८ नोव्हेंबरच्या पत्रानुसार प्रारूप रचना रद्द करून आता २०११ च्या लोकसंख्येनुसार वाढीव प्रारूप गट रचना करून ती माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या २९ जानेवारीच्या अध्यादेशानुसार गटांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे २०११ च्या लोकसंख्येनुसार रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६० ते ६२ गट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यादृष्टीने कोणत्या तालुक्यात किती गट वाढतील व नवीन गट कोणता निर्माण होईल, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची तपासणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.