निवखोल येथे कंत्राटी कामगाराच्या मृत्यू प्रकरणी लाईनमन विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- एक महिन्यापूर्वी शहरातील निवखोल येथे कंत्राटी पदावरील तरुणाचा पोलवर काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी लाईनमन विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणजित देवळे (रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महावितरण लाईनमनचे नाव आहे. त्याच्या विरोधात दिनेश अनंत शिंदे (46,रा.फणसवळे भावेवाडी,रत्नागिरी) यांनी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.45 वा. सुमारास निवखोल येथे त्यांचा मुलगा कंत्राटी कामगार कुंदन दिनेश शिंदे (21,रा.रत्नागिरी) याला लाईनमन रणजित देवळे याने कंपनीच्या कंत्राटदाराने कोणतेही सुरक्षा उपकरणे दिलेली नसताना पोलवर चढण्यास भाग पाडले होते. तेव्हा पोलवर चढून काम करत असताना कुंदनला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लाईनमन विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 106(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.